महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव, वेंगुर्ल्यात ३० ऑक्टोबरपासून तीन दिवसीय प्रदर्शन महोत्सव
वेंगुर्ला
महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे, त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणे आणि महिला सक्षमीकरणाला चालना देणे या उद्देशाने इनरव्हील क्लब वेंगुर्ला आणि लक्ष्मी आधार सेवा फाऊंडेशन वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026 या कालावधीत साई मंगल कार्यालयात भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात 10 महिला उद्योजिकांचा सन्मान करण्यात येणार असून लक्ष्मी आधार सेवा फाऊंडेशनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळाही याचवेळी होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता सौ. वेदिका विशाल परब यांच्या हस्ते होणार असून नर्मदा आई संस्थेच्या अध्यक्ष संध्या तेरसे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.या प्रदर्शनात महिला बचत गट, गृहउद्योजिका आणि नवउद्योजिकांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, गृहोपयोगी साहित्य, विविध उत्पादने आणि खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असतील. महिलांच्या कौशल्याला बाजारपेठ मिळावी, ग्राहकांशी थेट संपर्क साधता यावा आणि व्यवसाय विस्तार व्हावा हा प्रमुख हेतू असून भविष्यात महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी फाऊंडेशनतर्फे विविध महिला केंद्रित उपक्रम राबवले जाणार आहेत.महिला उद्योजिकांची उत्पादने समाजमाध्यमांवर पोहोचावीत यासाठी रील्स स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रथम क्रमांकास 5 हजार, द्वितीयस 3 हजार, तृतीयस 2 हजार आणि उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी 1 हजार रुपये अशी एकूण 12 हजार रुपयांची पारितोषिके आणि सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धकांनी प्रदर्शनातील उत्पादने, महिला उद्योजिकांचे कार्य, खरेदीचा अनुभव किंवा ग्राहक प्रतिक्रियांवर आधारित 30 सेकंद ते एक मिनिटाची मराठी रील तयार करून Instagram वर #लक्ष्मीआधार2026 हॅशटॅगसह पोस्ट करावी. महोत्सवाची वेळ सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत असून स्टॉल नोंदणीसाठी ज्योती देसाई 9420258777 आणि सौ. वृंदा गवंडळकर 9823118778 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
konkansamwad 
