विद्यार्थ्यांनी शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सांभाळावे : डॉ अश्विनी माईणकर. महिला दिनानिमित्त खर्डेकर महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन.

वेंगुर्ला.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयातील महिला विकास कक्ष आणि उत्कर्षा समितीच्या वतीने महाविद्यालयात डॉ. अश्विनी माईणकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्त्री व पुरुष हे शिव शक्तीचे अर्धनारी नटेश्वराचे प्रतीक आहेत. या दोघांच्या परस्पर सहकार्यातूनच चांगल्या भविष्याची निर्मिती शक्य आहे. असे विचार त्यांनी व्यक्त केले. तसेच स्त्री व पुरुष हे परस्पर पुरक घटक असून समाज स्वास्थ्य टिकविण्याची जबाबदारी दोघांचीही आहे असे नमूद केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची जीवनशैली कशी असावी यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी लवकर उठण्याची व झोपण्याची सवय लावून घ्यावी. सर्वांगसुंदर सुर्यनमस्काराचे व ध्यानाचे महत्व समजावून सांगितले तसेच फ़ास्टफूड पेक्षा सकस, घरात बनविलेल्या चौरस आहारावर भर देण्यास सांगितले. सोशल मिडियाच्या अती वापराने आताची युवा पिढी दिशाहीन आयुष्य जगत आहे. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. याचबरोबर सोशल मिडीयाच्या अधीन झालेल्या समाजाला मानसिक अनारोग्याचा धोका संभवतो ही भितीही व्यक्त केली.
या कार्यक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांनी 'स्त्री' केंद्रित काव्यवाचन, गीतगायन केले. फ़ाल्गुनी नार्वेकर हिने 'ती फुलराणी' नाटकातील मंजुळा व्यक्तिरेखेचा मवेश नाट्यप्रवेश सादर केला. तसेच सानिका वराडकर हिने जिजाऊंचा तर विधी नाईक हिने ताराराणीच्या भूमिकाचा सवेश सादरीकरण केले. सोनाली चेंदवणकर हिने गीतगायन केले. सदर कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद होता.
यावेळी फ़िल्ममेकर अपूर्वा महाडिक, बी.आर.सी. महिला प्रतिनीधी ठाकूर मॅडम व आळवे मॅडम यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांस्कृतिक विभाग प्रमुख व राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.वामन गावडे होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विकास कक्षाच्या चेअरमन डॉ. मनिषा मुजुमदार यांनी तर प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा.एस. एस. देशपांडे यांनी करुन दिली. सदर कार्यक्रमास संस्थेचे सचिव प्रा.जयकुमार देसाई, चेअरमन डॉ.मंजिरी मोरे, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई तसेच प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले यांनीही शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फ़ाल्गुनी नार्वेकर हिने केले तर आभार प्रा.शर्वरी कांबळी मानले.