वेंगुर्ल्यात शनिवारपासून रंगणार रोटरीचा जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव, दीडशे रोटेरियन होणार सहभागी
वेंगुर्ला
वेंगुर्ला येथील कॅम्प मैदानावर शनिवार दि. २८ नोव्हेंबर पासून रोटरी डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स रंगणार आहेत. या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या क्रीडा महोत्सवात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक, धारवाड, कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, चिपळूण या ठिकाणचे मिळून सुमारे दीडशे रोटेरियन सहभागी होणार असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन क्लबचे प्रेसिडेंट अॅड. प्रथमेश नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या वतीने 28 व 29 नोव्हेंबर या कालावधीत वेंगुर्ला शहरातील कॅम्प मैदानावर रोटरी डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स 2026 या जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आज रोटरी कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे अध्यक्ष प्रथमेश नाईक, सेक्रेटरी मुकुल सातार्डेकर, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्सचे अध्यक्ष व क्लबचे पास्ट प्रेसिडेंट योगेश नाईक, नगराध्यक्ष तसेच स्पोर्ट्स हेड दिलीप गिरप, डॉ. राजेश्वर उबाळे, रोटरी क्लबचे आगामी अध्यक्ष दादा साळगावकर, अनमोल गिरप, पंकज शिरसाठ आणि नगरसेवक प्रणव वायंगणकर उपस्थित होते.या क्रीडा महोत्सवात क्रिकेट, बॅटमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, स्विमिंग आदी क्रीडा प्रकार खेळविले जाणार आहेत. या क्रीडा प्रकारांचा थरार पहाण्यासाठी क्रीडाप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहनही अॅड. नाईक यांनी केले. गेले दोन वर्षांपूर्वी अशा प्रकारचे स्पोर्टस् वेंगुर्ला येथे झाले होते. त्यावेळी नियोजनाची सर्व जबाबदारी नगराध्यक्ष दिलीप गिरप, राजू वजराटकर यांच्यासह सर्व रोटरी क्लबच्या सदस्यांनी घेतली होती. त्याचे नियोजन उत्तमरित्या झाले होते. त्यावेळचे नियोजन पाहून आत्ताचे डिस्ट्रिक्ट 3170 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. लेनी डिकॉस्टा यांनी आपल्या कार्यकाळात वेंगुर्ला येथेच हा महोत्सव घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार पुन्हा एकदा वेंगुर्ला रोटरी क्लबला जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव भरविण्याचा मान मिळाला असल्याची माहिती योगेश नाईक यांनी दिली.रोटरीचा जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव हा कोल्हापूर, पुणे, गोवा अशा मोठ्या शहरांमध्ये घेतला जातो. वेंगुर्ल्यासारख्या छोट्या गावाला हा मान मिळणे आम्ही आमचे भाग्य समजतो. यापूर्वी आम्ही या महोत्सवामध्ये सहभागी झालो होतो. परंतु, एकाच ठिकाणी सर्व क्रीडा प्रकारांची मैदाने नसतात. मात्र, वेंगुर्ला हे असे केंद्र आहे जे एकाच ठिकाणी सर्व क्रीडा प्रकारांची मैदाने आहेत. त्यामुळे हा मान आम्हाला मिळाला. वर्षभर सगळे रोटेरियन आपापल्या नोकरी व्यवसायात व्यस्त असतात. त्यातून त्यांना विरंगुळा मिळावा हा या महोत्सवामागचा उद्देश असल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सांगितले.या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी सकाळी 9 वाजता आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी, वेंगुर्ला मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. लेनी डिकॉस्टा, जिल्हापरिषद अध्यक्ष प्रमोद कामत, नगराध्यक्ष दिलीप गिरप, अॅडमिन फ्लोरी फर्नांडिस, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो. प्रणय तेली, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ, रो. डॉक्टर विद्याधर तायशेटे, असिस्टंट गव्हर्नर रो. अभिषेक माने उपस्थित राहणार आहेत.
konkansamwad 
