आंबा गळून पडल्याने बागायतदारांचे मोठे नुकसान

देवगड
यावर्षी मुळातच हापूस आंब्याचे घटलेले उत्पादन त्यातच जानेवारी महिन्यात मोहर आलेला आंबा एप्रिल महिन्यात एकदमच तयार झाला. कमी कालावधीत तयार झालेला जास्त आंबा काढण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता अशा स्थितीत तयार झालेला सर्वच आंबा काढणे शक्य न झाल्याने आंबा कलमांवरील आंबा गळून जमीनीवर पडल्याने बागायतदार संकटात सापडले आहेत. त्यातच आंब्याचे उत्पादन घटले असतानाही वाशी मार्केटमध्ये आंब्याचे दरही गडगडल्याने बागायतदार आणखी संकटात सापडला आहे.जगप्रसिध्द असलेला देवगड हापूस बाजारपेठेत दाखल झाला आहे. मात्र पहिल्या टप्प्यातील आंब्याचे उत्पादन हे कमालीचे घटल्याने बाजारेपेठेतही तुरळक आंबा दाखल झाला होता. आंब्याचा एक डझनी दर १ हजार ते १८०० रूपये होता. डिसेंबर जानेवारी महिन्यात मोहर आलेला आंबा एप्रिल महिन्यात पुर्णतः तयार झाला मात्र या हंगामात आंब्याचे उत्पादन कमालीचे घटल्याने नेपाळी कामगार वर्गालाही बागायतदारांनी पुन्हा परत पाठवले. यामुळे एप्रिल महिन्यात एकदमच तयार झालेला आंबा काढणे क्रमप्राप्त असल्याने बागायतदारांनी आंबा काढणी जोरात सुरू केली. परंतू कमी कालावधीत जास्त झालेला आंबा व दुसरीकडे मनुष्यबळ कमी अशा परिस्थितीत सर्वच आंबे काढणे अशक्य असल्याने बहुतांशी आंबा गळून खाली पडला. यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले असून दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती बागायतदारांची झाली आहे. वाशी मार्केटमध्येही आंब्याचे दर गडगडले असून कमी उत्पादन असतानाही चांगले दर मिळतील अशी अपेक्षा होती. सध्या स्थानिक बाजारपेठेत देवगड हापूस दाखल झाला आहे. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात मोहर आल्यानंतरचा हा पहिल्या टप्प्यातील आंबा होता. मात्र अनुकुल वातावरण नसल्यामुळे यावर्षी आंबा उत्पादन घटले. सध्या स्थानिक बाजारपेठांमध्ये आंबा दाखल झाला आहे. यावर्षी ३० टक्केच आंब्याचे उत्पादन झाले असून यातील दुसऱ्या टप्प्यातील ७० ते ८० टक्के आंबा हा मार्च एप्रिल या दोन महिन्यातील आहे. तर उर्वरीत राहीलेला तुरळक आंबा मे महिन्यात बाजारपेठेत दाखल होईल. मात्र आंब्याचे उत्पादन कमालीचे घटल्याने आंबा हंगाम लवकर संपण्याची शक्यता आहे असे मत आंबा बागायतदार यांनी व्यक्त केले. नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात मोहर आला मात्र अनुकूल वातावरण नसल्यामुळे व वांझ मोहराचे प्रमाण जास्त असल्यामुळे पहिल्या टप्प्यात आंब्याचे उत्पादन २ ते ३ टक्केच झाले. तर जानेवारी महिन्यातही मोहर समाधानकारक आला नाही. यामुळे दुस-या टप्प्यात आंब्याचे उत्पादन हे ३० टक्क्यापर्यंत राहीले. फेब्रुवारी महिन्यात अत्यल्प मोहर आल्याने शेवटच्या टप्प्यात दाखल होणारा आंबाही फार कमी असेल. कमी आंबा असल्यामुळे यावर्षीचा आंबा हंगाम लवकर संपण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. एप्रिल महिन्यात तयार झालेला आंबा हा जास्त आहे तोही आठ दिवसात संपेल. मात्र एवढा आंबा काढणे शक्य नसल्याने आंबा गळून खाली पडत आहे. यात बागायतदारांचेच मोठे नुकसान होत आहे.