कणकवली येथील दिव्यांग प्रमाणपत्र शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

कणकवली येथील दिव्यांग प्रमाणपत्र शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

कणकवली.

   एकता दिव्यांग संस्थेतर्फे दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात शिबीर आयोजित केले होते. या शिबिराला दिव्यांगांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. किर्लोसकर, आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे, एकता दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष सुनील सावंत, सचिव सचिन सादिये, उपाध्यक्ष संजय वारंगे, विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांच्यासह डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.
   दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकता दिव्यांग संस्थेतर्फे 15 ऑगस्टला प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत प्रांताधिकारी जगदिश कातकर व तत्कालीन तहसीलदार आर. जे. पवार यांनी मागण्यापूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले होते. दिव्यांगांच्या काही मागण्या आपल्या स्तरावर मार्गी लावण्याचा शब्द त्यांनी दिला होता.त्यानुसार एकता दिव्यांग संस्थेच्या पुढाकारने व आरोग्य विभागाच्या सहकार्याने दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात  शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला 150 हून अधिक दिव्यांग बांधव सहभागी झाले होते. दिव्यांग प्रमाणपत्र युडीआयडी कार्ड काढल्यामुळे दिव्यांगांना शासनाच्या विविध योजना व सोयीसुविधांचा लाभ घेणे शक्य होणार आहे.