प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताच्या गोळ्या विकल्यास कारवाई - डॉ. श्रीपाद पाटील.....औषध विक्रेत्यांनी नियमांचे पालन करा

प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताच्या गोळ्या विकल्यास कारवाई - डॉ. श्रीपाद पाटील.....औषध विक्रेत्यांनी नियमांचे पालन करा

ओरोस
 

       वैध वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची खरेदी-विक्री अथवा स्वतःच्या मनाने वापर करणे महिलांच्या आरोग्यासाठी गंभीर ठरू शकते. अशा औषधांच्या अनधिकृत विक्रीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी केवळ नोंदणीकृत वैद्यकीय तज्ज्ञांच्या वैध प्रिस्क्रिप्शनवरच गर्भपाताच्या औषधांची विक्री करावी. नियमबाह्य विक्री आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिला.वैद्यकीय गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा वापर नोंदणीकृत वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि वैध प्रिस्क्रिप्शनवरच करणे सुरक्षित व कायदेशीर आहे. वैद्यकीय तपासणीशिवाय किंवा कोणाच्याही सल्ल्याने अशा औषधांचा वापर केल्यास अतिरक्तस्त्राव, अपूर्ण गर्भपात, गंभीर संसर्ग यांसारख्या गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. काही परिस्थितीत महिलेच्या जीवितासही धोका निर्माण होऊ शकतो.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व औषध विक्री परवानाधारकांनी गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची विक्री केवळ वैध वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनवरच करावी. प्रिस्क्रिप्शनशिवाय किंवा नियमबाह्य पद्धतीने औषधांची विक्री करणाऱ्यांवर लागू कायदे व नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे.नागरिकांनी अनधिकृत ठिकाणांहून किंवा कोणाच्याही सल्ल्याने गर्भपाताच्या गोळ्या खरेदी करू नयेत. सुरक्षित व कायदेशीर वैद्यकीय गर्भपातासाठी शासनमान्य आरोग्य संस्था, नोंदणीकृत वैद्यकीय गर्भपात केंद्र किंवा स्त्रीरोगतज्ज्ञांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. महिलांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, सुरक्षित वैद्यकीय गर्भपात सेवा उपलब्ध करून देणे आणि बेकायदेशीर गर्भपाताला प्रतिबंध करणे ही सामूहिक जबाबदारी आहे. गर्भपाताच्या औषधांची बेकायदेशीर विक्री किंवा संशयास्पद प्रकार आढळल्यास आरोग्य विभाग अथवा अन्न व औषध प्रशासनाला तातडीने माहिती द्यावी, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.