कोल्ड्रींक्सच्या रिकाम्या बाटल्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रेलरला अपघात
कुडाळ
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर कुडाळ जवळील बिबवणे-नाईकवाडी येथे कोल्ड्रींक्सच्या रिकाम्या बाटल्यांची वाहतूक करणाऱ्या एका ट्रेलरला अपघात झाला. या अपघातात महामार्गाच्या कडेला असलेल्या एका कलिंगड विक्रीच्या स्टॉलला ट्रेलरने जोरदार धडक दिली, ज्यामध्ये स्टॉलचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कोल्ड्रिंकच्या रिकाम्या बाटल्या घेऊन जाणारा ट्रेलर गाडी क्र.MH 46 BX 4349 मुंबई-गोव्याच्या दिशेने जात असताना, बिबवणे नाईकवाडी परिसरामध्ये चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला. ट्रेलर थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या कलिंगड विक्रीच्या स्टॉलमध्ये घुसल्याने स्टॉल पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. संबंधित स्टॉलधारकाचे यामुळे अंदाजे ८० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.अपघाताची वेळ पहाटेची असल्याने आणि स्टॉलवर कोणीही नसल्याने एक मोठा अनर्थ टळला. ट्रेलर चालक नरेश कुमार रघुवीर सिंग हा देखील या भीषण अपघातातून थोडक्यात बचावला असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्याचे काम प्रशासनाकडून तातडीने हाती घेण्यात आले. या अपघाताची नोंद स्थानिक पोलिसांत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
konkansamwad 
