३० जूनपर्यंत 'एचएसआरपी' नंबर प्लेट बंधनकारक अन्यथा दंडात्मक कारवाई
सिंधुदुर्गनगरी
जुन्या वाहनांसाठी एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ पर्यंत असून जिल्ह्यातील वाहनधारकांनी तात्काळ नोंदणी करून नंबर प्लेट बसवून घ्याव्यात असे आवाहन सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी केले आहे.राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP - High Security Registration Plate) बसविणे शासनाने अनिवार्य केले असून, यासाठीची अंतिम मुदत ३० जून २०२६ पर्यंत आहे.एचएसआरपी नंबर प्लेट ही विशेष सुरक्षा वैशिष्ट्यांनी युक्त असून वाहनांची अचूक ओळख पटविणे, बनावट नंबर प्लेटचा गैरवापर रोखणे, चोरी व गुन्हेगारी नियंत्रणास मदत करणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जाते.दि. ३० जून २०२६ नंतर एचएसआरपी नंबर प्लेट न बसविलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तथापि, अंतिम मुदतीपूर्वी अधिकृत संकेतस्थळावर अपॉइंटमेंट बुक केलेल्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
वाहनधारकांनी खालील बाबींची विशेष नोंद घ्यावी
दि. ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी HSRP बंधनकारक आहे.नंबर प्लेट बसविण्यासाठी अधिकृत विक्रेता / केंद्रावर पूर्वनियोजित अपॉइंटमेंट आवश्यक आहे.शेवटच्या काळात गर्दी टाळण्यासाठी वाहनधारकांनी तात्काळ नोंदणी करावी.HSRP बसविण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध आहे.HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी वाहनधारकांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन अर्ज व स्लॉट बुकिंग करावे
https://transport.maharashtra.gov.in
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी शासनाच्या सूचनांचे पालन करून विहित मुदतीत HSRP नंबर प्लेट बसवून घ्याव्यात, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.
konkansamwad 
