मानव साधन विकास संस्थेच्या 'प्रोजेक्ट संजीवनी'.....ॲम्ब्युलन्सचे कुडाळमध्ये शुभारंभ
कुडाळ
ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच आरोग्य आणि रक्त तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ या उपक्रमाची ॲम्ब्युलन्स सेवा कुडाळ येथे सुरू करण्यात आली. ‘एक थेंब… एक आशा’ या संकल्पनेवर आधारित या सेवाभावी उपक्रमाचा शुभारंभ कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.या प्रसंगी देशाचे माजी केंद्रीय मंत्री श्री. सुरेश प्रभू, मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. उमा प्रभू, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, आरोग्य सभापती श्री. प्रितेश राऊळ यांच्यासह डॉक्टर व संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते.कोकणभूमीचे सुपुत्र असलेले सुरेश प्रभू यांनी देशाच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा गौरव करताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई म्हणाले, "श्री. सुरेश प्रभू हे देशासाठी एक संपत्ती आहेत. त्यांचे कार्य आणि योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे. असे कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व आपल्या कोकणचे आहे, हे आमचे भाग्य आहे."तसेच आरोग्यसेवा जनसामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या या उपक्रमाला शुभेच्छा देताना प्रसंन्ना देसाई यांनी सौ. उमा प्रभू आणि श्री. सुरेश प्रभू यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.ग्रामीण भागातील लोकांना वेळीच आरोग्य सुविधा मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
konkansamwad 
