वेंगुर्ल्यात १५ डिसेंबर रोजी साने गुरुजी शिक्षक साहित्य संमेलन.

वेंगुर्ल्यात १५ डिसेंबर रोजी साने गुरुजी शिक्षक साहित्य संमेलन.

 

   साने गुरुजींच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त बॅ. नाथ सेवांगण, मालवण आणि मुक्तांगण, वेंगुर्ले यांच्यावतीने सोमवार १५ डिसेंबरला सकाळी १० वाजता वेंगुर्ले येथील परुळेकर दत्त मंदिरच्या प्रांगणात 'साने गुरुजी शिक्षक साहित्य' संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती करमळकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिका तथा निवृत्त शिक्षिका वृंदा कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून कवी वीरधवल परब, वेंगुर्ले पंचायत समितीचे निवृत्त गटशिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर, एम. पी. मेस्त्री, निवृत्त केंद्रप्रमुख तथा वेंगुर्ले नगर वाचनालयाचे कार्यवाह कैवल्य पवार, निवृत्त शिक्षक रमण किनळेकर, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते सत्यवान पेडणेकर, कवी विठ्ठल कदम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
  उद्घाटनानंतरच्या सत्रात सकाळी ११.३० ते १२.१५ या वेळेत संत साहित्याचे अभ्यासक अॅड. देवदत्त परुळेकर यांचे 'साने गुरुजी समजून घेताना' या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतरच्या सत्रात १२.१५ ते १.३० या वेळेत 'कथा साने गुरुजींच्या' हा कथाकथनाचा विशेष कार्यक्रम होणार आहे. यात भरत गावडे, श्यामल मांजरेकर, वंदना सावंत, प्राजक्ता आपटे, देवयानी आजगावकर व महेश बोवलेकर यांचा सहभाग आहे.
साहित्य संमेलनाची सांगता कविसंमेलनाने होणार आहे. दुपारी २.३० ते ४ या वेळेत होणाऱ्या या कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान कणकवली येथील कवी प्रा. मोहनं कुंभार भूषविणार आहेत.