बांदा शहरात हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत.
बांदा
हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बांदा शहरात आज भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक संस्कृतीची झलक आणि प्रचंड उत्साह असलेल्या या रॅलीमध्ये बांदा परिसरातील हिंदू बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक एकात्मता आणि संस्कृती जतनाचे दर्शन घडले.रॅलीची सुरुवात हिंदवी स्वराज्य धर्मध्वज येथे भगवा ध्वज फडकवून आणि त्याला अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर कट्टा कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, काळसेवाडी, श्री देव बांदेश्वर भूमिका मंदिर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक आणि मोर्येवाडा-आळवाडा अशा मुख्य मार्गावरून ही रॅली काढण्यात आली. ठिकठिकाणी या रॅलीचे स्वागत करण्यात आले असून, अखेर श्रीराम चौक येथे या रॅलीची सांगता झाली. बांदा शहरात निघालेल्या या रॅलीमुळे संपूर्ण वातावरण भगवेमय झाले होते. नववर्षाचे स्वागत उत्साहात करण्यासोबतच आपल्या गौरवशाली परंपरेचा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

konkansamwad 
