निलेश लंकेंनी घेतली इंग्रजीतून खासदारकीची शपथ; लंकेंचे सुजय विखेंना लोकसभेतून प्रत्युत्तर.

निलेश लंकेंनी घेतली इंग्रजीतून खासदारकीची शपथ; लंकेंचे सुजय विखेंना लोकसभेतून प्रत्युत्तर.

नवीदिल्ली.

    अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या सुजय विखे पाटलांचा पराभव करून निलेश लंके विजयी झाले. आज लंके यांनी लोकसभेचा सदस्य म्हणून संसदेत इंग्रजी भाषेतून शपथ घेतली. निलेश लंकेंनी इंग्रजी भाषेत घेतलेली शपथ सध्या चर्चेचा मुद्दा बनली आहे.
   अहमदनगर मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारात निलेश लंके यांच्या शिक्षणावरून त्यांना विरोधकांनी हिणवलं होतं. त्यात सुजय विखे पाटील यांनी भाषणात निलेश लंके इंग्रजीतून कसं बोलणार, त्यांना इंग्रजी येते का असा सवाल उपस्थित करत त्यांची खिल्ली उडवली होती. मात्र निलेश लंके यांनी सुजय विखे पाटलांचा पराभव करत दिल्ली गाठली. दिल्लीच्या संसदेत जाताना खासदार निलेश लंके यांनी पायऱ्यांवर डोकं टेकलं. त्यानंतर सभागृहात खासदारांचा शपथविधी होत असताना निलेश लंके यांचे नाव पुकारले. तेव्हा निलेश लंके यांनी चक्क इंग्रजीतून शपथेला सुरुवात केली त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर लंके यांनी शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि रामकृष्ण हरी म्हणत हात जोडले.
   निवडणुकीच्या प्रचारात सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना इंग्रजी भाषेवरून टोला हाणला होता. लोकसभेच्या निवडणुकीतून निवडून आलेला खासदार दिल्लीत जातो. त्यामुळे, या खासदार महोदयांना हिंदी, इंग्रजी भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे अशी बोचरी टीका विखेंनी निलेश लंकेंवर केली. त्याचसोबत निलेश लंकेंनी माझ्याएवढे इंग्रजी बोलून दाखवावे, भलेही एक महिनाभर भोकमपट्टी करावी, पाठ करुन बोलून दाखवावे, पण इंग्रजीत बोलावे. त्यांनी इंग्रजीत बोलून दाखवल्यास मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतो असं चॅलेंजच सुजय विखेंनी लंकेंना दिले होते. त्या टीकेला निलेश लंकेंकडूनही जशास तसं उत्तर देण्यात आलं होतं.