वेंगुर्ला येथील श्री देव मानसीश्वर जत्रोत्सवाची लगबग सुरू.

वेंगुर्ला.
वेंगुर्ला येथील जागृत देवस्थान व नवसाला पावणारा देव अशी ख्याती असलेल्या श्री देव मानसीश्वराचा वार्षिक जत्रोत्सव दरवर्षी 'माघ शुक्ल पक्ष अष्टमी'ला म्हणजेच उद्या होणार आहे.या देवस्थानच्या वार्षिक जत्रोत्सवाला 'शिडाची जत्रा व बत्तीची जत्रा' या नावाने ओळखले जाते. गॅसबत्ती रात्रभर पेटवून ठेवण्याचा नवस अनेक भक्त करतात.
यावेळी परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून विविध खाद्य पदार्थ, खेळणी दुकाने, स्टॉल आकाशपळणी आदींनी परिसर सजून निघालेला पहावयास मिळत आहे.
या देवासाठी खासकरून चुरमु-याचे लाडू, शेंगदाणे, लाडू, केळी, नारळ, भगवी निशाण, पेट्रोमॅक्स बत्त्या, घंटी अशा स्वरूपाचे नवस भाविक लोक श्रद्धेने करतात.
जत्रोत्सवादिवशी सुमारे ५ ते ६ हजार भगव्या निशाणीच्या पताका या देवस्थानाला भाविक लोक घालतात.सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावेळी बांबूच्या काठीस भगवा झेंडा लावलेले निशाण घेऊन प्रत्येकजण येतात आणि भगव्या निशाणांनी देवस्थान सजते.भगव्या निशाणांचे विलोभनीय दृश्य दिसते. दिवसभरात सुमारे हजारोंच्या संख्येने
लोक या जत्रेला येतात.जिल्ह्यातील, तसेच मुंबई, गोवा, बेळगाव आणि कोल्हापूर येथूनही भाविक येऊन त्यांचा नवस फेडतात.या जत्रेत दशावतारी नाटक पेट्रोमॅक्सच्या बत्तीच्या उजेडात सादर केला जाणार आहे.आज रात्रौ १२ वाजल्यापासून मंदिरामध्ये नवस फेडण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागणार आहेत.