मोती तलाव विकास आराखडा आधी नगरपालिकेत ठेवा....माजी नगराध्यक्ष संजू परब यांची मागणी
सावंतवाडी
मोती तलावाच्या विकासासंदर्भात नगराध्यक्षांनी तयार केलेला आराखडा आधी त्यांनी नगरपालिकेच्या सभागृहात ठेवावा, त्यावर आम्हा सर्व लोकप्रतिनिधींच्या सूचना घ्याव्यात आणि त्यानंतरच तो आराखडा मंजुरीसाठी पाठवून प्रशासकीय मान्यता घ्यावी, असे स्पष्ट मत माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांनी व्यक्त केले आहे. तसेच प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतरच यावर भाष्य करणे योग्य ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.मोती तलाव हा शहराचा ऐतिहासिक वारसा आणि मुख्य आकर्षण असल्याने त्याच्या विकासाबाबत शहरात सध्या विविध चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर संजू परब यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पाचा आराखडा तयार करताना नगरपालिकेच्या सर्व सदस्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. हा आराखडा थेट मंजुरीसाठी न पाठवता, आधी त्यावर पालिकेच्या सभागृहात सविस्तर चर्चा झाली पाहिजे.सभागृहातील चर्चेदरम्यान सर्व नगरसेवकांना आपल्या भागातील आणि नागरिकांच्या सूचना मांडण्याची संधी मिळेल, ज्यामुळे हा आराखडा अधिक परिपूर्ण होऊ शकेल.सभागृहाच्या मंजुरीनंतरच तो पुढील प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवण्यात यावा आणि कायदेशीर मंजुरी मिळाल्यानंतरच प्रशासनाने किंवा नगराध्यक्षांनी त्यावर जाहीर भाष्य करावे, अशी आग्रही मागणी संजू परब यांनी केली आहे.
konkansamwad 
