गंभीर मारहाण प्रकरणातून पाचजणांची निर्दोष मुक्तता
कणकवली
बिअरशॉपीचे लायसन्स व इमारत बांधकामासाठी १ लाख ५५ हजार रुपये घेतले. मात्र, कोणतेही काम न केल्याने पैशाची मागणी केल्याच्या रागातून घोणसरी येथील विनोद विठोबा शिंदे यांच्या घरात घुसून त्यांच्यासह पत्नी व शेजारी यांना गंभीर मारहाण केल्याप्रकरणी लोरे नं. १ येथील संजय अनिरुद्ध एकावडे, सुरेश परशुराम एकावडे, संतोष परशुराम एकावडे, मंगेश सुरेश एकावडे व जीजू सुरेश एकावडे यांची येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शुभम लटुरिया यांनी निर्दोष मुक्तता केली.२८ मे २०१६ रोजी सायंकाळी आरोपी व फिर्यादी यांच्यात तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्याकडे बैठक झाली. यात बिअरशॉपीचे लायसन्स मिळविणे व इमारत बांधण्यासाठी संजय एकावडेने फिर्यादीकडून घेतलेली रक्कम देण्याचे ठरले. नंतर रात्री आरोपी बेकायदा जमाव करून फिर्यादीच्या घरी गेले. दरवाजा उघडला नाही, म्हणून दरवाजा तोडून घरात घुसले व दांड्याने मारहाण केली. तसेच पत्नीलाही मारहाण केली.शेजारी प्रकाश कारेकर सोडविण्यास आले असता, त्यांनाही मारहाण केली. ठार मारण्याची धमकी देत आरोपी निघून गेले. सुनावणीत सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती, वैद्यकीय पुराव्याबाबत साक्षंकता, महत्वपूर्ण साक्षीदार न तपासणे आदी कारणास्तव आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.आरोपींतर्फे अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
konkansamwad 
