अज्ञात व्यक्तीच्या गोळीने गायीचा जागीच मृत्यू मोरगाव-दोडामार्ग येथील घटना
दोडामार्ग
मोरगाव येथील शेतकरी गोविंद बाळा दळवी यांच्या एका दुधाळ गायीवर अज्ञात व्यक्तीने बंदुकीतून गोळी झाडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार जंगलात शिकारीच्या उद्देशाने चुकून घडला की कोणाशी असलेल्या वैयक्तिक वादातून गायीला जाणीवपूर्वक मारण्यात आले?, याचा तपास आता दोडामार्ग पोलीस करत आहेत.नेहमीप्रमाणे गोविंद दळवी यांनी आपली गुरे चरण्यासाठी सोडली होती. इतर सगळी गुरे घरी परतली, पण ही दुधाळ गाय घरी आली नाही. त्यामुळे दळवी यांनी आजूबाजूला तिचा बराच शोध घेतला, मात्र अंधार पडल्याने त्यांना शोध थांबवावा लागला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच पुन्हा शोध घेत असताना, दळवी यांच्या घराजवळच असलेल्या एका काजूच्या बागेत ही गाय रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेली आढळली. गायीच्या जवळ जाऊन पाहिले असता तिच्या पोटातून मोठा रक्तस्राव झाला होता. नीट पाहणी केल्यावर तिच्या पोटावर बंदुकीची गोळी लागल्याचे आणि ती आरपार गेल्याचे स्पष्ट झाले. गोळी वर्मी लागल्यामुळेच गायीने जागीच प्राण सोडल्याचा अंदाज आहे. आपल्या हक्काच्या दुधाळ गायीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने दळवी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी गोविंद दळवी यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली असून, अशा क्रूर प्रवृत्तीच्या माणसाचा पोलिसांनी तातडीने शोध घेऊन त्याला कडक शिक्षा करावी, अशी मागणी गावकरी करत आहेत.
konkansamwad 
