कुटुंबाचा एक भाग आहोत अशा प्रकारची मानसिकता ठेऊन बँकेसाठी काम करूया : मनिष दळवी.

कुटुंबाचा एक भाग आहोत अशा प्रकारची मानसिकता ठेऊन बँकेसाठी काम करूया : मनिष दळवी.

सिंधुदुर्ग.
                 
  बँक ही आपली संस्था आपलं कुटूंब आहे व आपण त्या कुटुंबाचा एक भाग आहोत अशा प्रकारची मानसिकता ठेऊन जे बँक कर्मचारी बँकेसाठी काम करत आहेत त्याच बँका आजच्या क्षणाला यशस्वी ठरल्या आहेत आणि त्या पैकी आपण एक आहोत याचा मला सार्थ आभिमान आहे. एकत्रितपणे काम केल्यास निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्हा ही महाराष्ट्रातील एक आदर्श बँक व आदर्श कर्मचारी असलेली बँक अशी ओळख आपण निर्माण करु शकू असे प्रतिपादन सिधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी ओरोस येथील श्री इच्छापुर्ती गोविंद मंगल कार्यालय येथे केले. ते को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘तणावाचे व्यवस्थापन’ या कार्यक्रमात बोलत होते.
  या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरूवात जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, युनियनचे कार्याध्यक्ष  विष्णू तांडेल, युनियन पदाधिकारी प्रमोद पार्टे,  जनरल सेक्रेटरी नितीन शेटये, रवींद्र पावसकर, अमोल सावंत, विष्णु धुरी, समीर परब, श्री. हडकर, रामदास रासम, कर्मचारी संचालक प्रतिनिधी देवेंद्र धुरी, सुनिल फणसेकर, देवानंद लोकेगांवकर आदी मान्यवर तसेच जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे तसेच जिल्हा बँकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
   यावेळी पुढे बोलताना मनिष दळवी म्हणाले की जिल्हा बँकेला आज ४० वर्ष पुर्ण झाली असुन बँकेची ६००० कोटीच्या व्यवसायाच्या टप्याकडे वाटचाल सुरु आहे. आजपर्यंतच्या काळात जिल्हा बँक कर्मचाऱ्यानी अहोरात्र बँकेच्या भल्याचा विचार केला.त्या संस्थेच्या माध्यमातुन ग्राहकाला चांगली सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि म्हणुन आज आपण कोकणामध्ये रत्नागिरी, रायगड, ठाणे या तिन्ही बँकामध्ये आपण प्रथम क्रमांकापर्यंत पोहोचलो. बदलत्या स्पर्धेच्या जगात काम करत असताना आपल्यावर ताण-तणाव येतो. हा तणाव दुर करण्यासाठी सुयोग्य प्रशिक्षणाची आवश्यकता असते.आपल्या काही गोष्टी चुकत असतील त्या कुठल्या तरी तणाव प्रक्रियेमध्ये न नेता त्यावर वेळच्या वेळी चर्चा करुन मार्ग काढले पाहिजेत. एकत्रितपणे काम केल्यास निश्चितपणे महाराष्ट्रातील एक आदर्श बँक, एक आदर्श कर्मचारी अशी आपण ओळख निर्माण करुया.  पुर्वीच्या कर्मचाऱ्यांनी चांगले काम केल्याने आम्ही आज ऐश्वर्य भोगतो आहोत पुढील काळातील लोकांनी आपण चांगले काम केले आहे असे म्हटले पाहिजे. 
 यावेळी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर दोन वर्षे पुर्ण झाली याबद्दल युनियनचे कार्याध्यक्ष विष्णु तांडेल यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे व्याख्य़ाते लक्ष्मीकांत शिंदे यांनी तणावाचे सुयोग्य व्यवस्थापन केले असेल तर हा तणाव आपण योग्य प्रकारे हाताळु शकतो तशी मानसिकता आपण बाळगणे आवश्यक आहे असे सांगुन उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्याना उदबोधक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन युगा पेडणेकर यांनी केले.