परुळे येथे १७ मे रोजी 'दुरितांचे तिमिर जावो नाट्य प्रयोग'

परुळे येथे १७ मे रोजी  'दुरितांचे तिमिर जावो नाट्य प्रयोग'

 

परुळे

 

    महाराष्ट्राला सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध करण्यात मराठी रंगभूमीचे बहुमूल्य योगदान आहे. या रंगभूमीने महाराष्ट्राला अनेक नामवंत नाटके, लेखक, कलाकार, तंत्रज्ञ दिले. मराठी रंगभूमीवरील अनेक गाजलेल्या नाटकापैकी असेच एक माइल स्टोन नाटक म्हणजे बाळ कोल्हटकर लिखित - दुरितांचे तिमिर जावो...! हे नाटक १९५७ साली ललितकलादर्श या नाट्यसंस्थेने प्रथम रंगमंचावर आणले.या नाटकातील दिगू ची भूमिका साकारणारे भालचंद्र पेंढारकर यांना एक वेगळीच ओळख या नाटकाने दिली.या नाटकाचे संवाद, पात्रे, प्रसंग, कथानक अशा अनेक गोष्टींमुळे हे नाटक आजही रसिकांच्या कायम लक्षात आहे. या नाटकातील प्रत्येक भूमिका ही महत्त्वपूर्ण आणि अभिनयास वाव देणारी अशीच आहे. या सर्व भूमिका त्या त्या काळातील विविध नाट्यकर्मीनी अतिशय चांगल्या प्रकारे निभावल्या आणि त्या प्रेक्षकांच्या पसंतीसही पडल्या.आणि म्हणूनच आजही अनेक कलाकारांना हे नाटक पुन्हा पुन्हा करावेसे वाटते आणि रसिकांनाही ते पुन्हा पुन्हा पहावेसे वाटते.असे हे सुप्रसिद्ध नाटक आपल्या परुळ्यातील नाट्यकलाकारानी १९६४ साली परुळ्यामध्ये सादर केले होते.यामध्ये खालील कलाकारांनी भूमिका केल्या होत्या.

दिगू-सुधा शिरसाट
पंत -अनंत (आबा) शिरसाट
सदू- वासू देसाई
बाबुराव - लखू काका जोशी
बापू सोनटक्के -आपा वालावलकर
मोहिते- बापू जानवेकर
येसनाक - शंकर घोलेकर

   त्याकाळी रंगभूमीवर गाजत असलेले नाटक ६२ वर्षांपूर्वीच्या प्रतिकूल परिस्थितीतही हौशी कलाकारांनी सादर करण्याचा तो एक धाडसी प्रयत्न होता असं म्हणाव लागेल.त्यानंतर पुन्हा एकदा १९८० साली याच नाटकाचा प्रयोग परुळ्यात  करण्यात आला. यावेळी कलाकार होते

दिगू - रवी तेली
पंत - गजानन तेली
सदू - हनुमंत तेली
बाबूराव -  बाबी माडये
बापू सोनटक्के -रमाकांत शिरसाट
मोहिते - दशरथ राठीवडेकर
येसनाक - दिवाकर घोलेकर
पोस्टमन - सुधीर पेडणेकर

    पुन्हा  एकदा लोकाग्रहास्तव १९९० साली हे नाटक परुळ्यात करण्यात आले. यावेळी कलाकार होते...
दिगू -हनुमंत तेली
पंत -गजानन तेली
बापु -काका परुळेकर
सदू -विजय मांजरेकर
बाबूराव -अजित परुळेकर
मोहिते - सुधीर पेडणेकर
येसनाक - हरी घोलेकर

     या तीनही प्रयोगातील कलाकारांनी आपल्या भूमिका अतिशय उत्तम रीतीने सादर केल्या होत्या.यातील काही कलाकार आज आपल्यात नाहीत तरीही परुळ्यातील  प्रेक्षक त्यांची आजही आवर्जून आठवण काढतात. हे सर्व सांगण्याचा उद्देश म्हणजे आपल्या परुळे गावाला लाभलेली उज्वल नाट्यपरंपरा.परुळ्यात होऊन गेलेल्या अनेक नाट्यकलाकारांनी अनेक वेगवेगळी आणि प्रसिद्ध नाटके परुळ्याच्या रसिकांसमोर सादर केली. त्यापैकी दुरितांचे  तिमिर जावो हे एक नाटक.
       आता पुन्हा एकदा हेच नाटक परुळ्यातील  नव्या दमाचे कलाकार रंगमंचावर घेऊन येत आहेत. दिनांक १७ मे रोजी श्रीदेव आदिनारायण मंदिराच्या रंगमंचावर सायंकाळी ठीक सात वाजता नाट्यझंकार परुळे निर्मित दुरितांचे तिमिर जावो या नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे.

यामध्ये भूमिका करणारे कलाकार
दिगू - हनुमंत तेली
पंत - अजित परुळेकर
सदू - सुनाद राऊळ
बाबुराव - सुहास परुळेकर
बापू सोनटक्के - विनोद राणे
मोहिते - अभय परुळेकर
येसनाक - आपा मांजरेकर

      मराठी रंगभूमीवरील एक खूप जुनी आणि अजरामर नाट्य कलाकृती पाहण्याची संधी परुळ्यातील नाट्य रसिकाना मिळणार आहे. तरी पुन्हा एकदा या नाटकाचा आनंद अवश्य घ्यावा..!परुळ्याच्या रंगभूमीवर होऊन गेलेल्या सर्व नाट्य कलाकारांना नाट्यझंकार  परुळे कडून विनम्र आदरांजली