विहिरीत पडलेल्या खवल्या मांजरची वनविभागाकडून यशस्वी सुटका

कुडाळ
कुडाळ तालुक्यातील पाट (गांधीनगर)येथे शंकर भगवान मराळ यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या अत्यंत दुर्मिळ अशा वन्यप्राणी खवल्या मांजरास (Pangolin)वनविभागाकडून नैसर्गिक अधिवासात यशस्वी सुटका करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सावंतवाडी वन विभागाला पाट (गांधीनगर) येथे विहिरीत खवल्या मांजर (pangolin) हा वन्यप्राणी पडला असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार कुडाळ वनक्षेत्रपाल अधिकारी संदीप कुंभार यांच्या नेतृत्वाखाली जलद बचाव पथक खवल्या मांजराच्या सुटकेसाठी घटनास्थळी दाखल झाले. विहीरित पडलेल्या खावल्या मांजरास सुखरूप रित्या बाहेर काढण्यासाठी पाट (गांधीनगर ) येथील ग्रामस्थ शंकर मराळ,किशोर मराळ यांच्या मदतीने वनविभागाच्या रेस्क्यू टीमने नायलॉन जाळीच्या सहाय्याने त्या खवल्या मांजराची सुटका करून त्या खवल्या मांजरची आरोग्य तपासणी करून आवश्यक उपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
सदरची बचाव मोहीम सावंतवाडी वनविभाग उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी ,सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, नेरूर तर्फे हवेली वनपाल दिनेश टिपूगडे, नेरूर तर्फ हवेली वनरक्षक
सचिन पाटील आकेरी वनरक्षक प्रसाद पाटील,नेरूर वनसेवक यशवंत कदम,अनिल गावडे,अमृस्कर, यांनी यशस्वीरित्या पार पाडली.दिनेश टिपूगडे यांनी सदर ठिकाणचा ग्रामस्थांचे आभार मानले.