सेवा संकल्प अभियाना अंतर्गत सावंतवाडीत महारक्तदान शिबिराचे आयोजन
सावंतवाडी
सेवा संकल्प अभियाना अंतर्गत पंचायत समिती सावंतवाडी, आरोग्य विभाग आणि उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:०० वाजता पंचायत समिती सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे आणि समाजात रक्तादानाबाबत जनजागृती व्हावी, या उदात्त हेतूने हे शिबीर आयोजित केले जात आहे. या उपक्रमाची विशेष बाब म्हणजे पंचायत समिती व आरोग्य विभागातील २५ ते ३० अधिकारी व कर्मचारी स्वत: पुढे येऊन स्वेच्छेने रक्तदान करणार आहेत. या सामाजिक उपक्रमास जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, पंचायत समिती सावंतवाडीच्या सभापती सुश्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व सदस्य, तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. रक्तदान हे केवळ दान नसून जीवनदान देण्याचे एक महान कार्य आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक मंडळे आणि रक्तादानास इच्छुक असलेल्या सर्व नागरिकांनी या जीवनदायी कार्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर आणि गटविकास अधिकारी निलेश जाधव यांनी प्रशासनामार्फत केले आहे.
konkansamwad 
