सावंतवाडीत गणेशोत्सवात स्थानिक विक्रेत्यांना प्रथम प्राधान्य द्या, अन्यथा घेराव घालू.....आशिष सुभेदार यांचा इशारा

सावंतवाडीत गणेशोत्सवात स्थानिक विक्रेत्यांना प्रथम प्राधान्य द्या, अन्यथा घेराव घालू.....आशिष सुभेदार यांचा इशारा

सावंतवाडी
 

       गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात स्थानिक फळ, फूल, भाजी विक्रेते तसेच स्थानिक व्यवसायिकांना नगरपालिकेने प्रथम प्राधान्य द्यावे. या ठिकाणी परप्रांतीय व्यावसायिकांची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा उबाठा शिवसेना युवा सेना तालुका प्रमुख आशिष सुभेदार यांनी दिला आहे.गणेश चतुर्थीला काहीच दिवस बाकी आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय विक्रेते शहरात दाखल होतात. हे विक्रेते मुजोरी दाखवत बहुतांश जागा अडवून ठेवतात, त्यामुळे स्थानिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास अडचणी निर्माण होतात.शहरात गर्दी लक्षात घेऊन नगरपालिकेकडून दरवर्षी नियोजन केले जाते. भाजी, फळ, फूल विक्रेत्यांना वेगळी जागा ठरवून दिली जाते, मात्र स्थानिक व्यापाऱ्यांच्या नशिबी फार कमी जागा येते. त्यामुळे दरवर्षी ऐन गणेशोत्सवात स्थानिकांवर अन्यायच होत आला आहे.यंदा सणासुदीला स्थानिकांना जागा वाटपात जास्त प्राधान्य द्यावे. परप्रांतीय व्यावसायिकांची वाढती मक्तेदारी यावेळी खपवून घेतली जाणार नाही. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी यात लक्ष घालून स्थानिक विक्रेते, व्यापारी, व्यावसायिक यांना प्रथम प्राधान्य द्यावे, अन्यथा उबाठा शिवसेना पक्षाच्या वतीने प्रशासनाला घेराव घालण्यात येईल, असा इशारा आशिष सुभेदार यांनी दिला आहे.