वेंगुर्ल्यात दिव्यांग मेळावा उत्साहात.....दीडशे दिव्यांग बांधवांना साहित्याचे वाटप; सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम

वेंगुर्ल्यात दिव्यांग मेळावा उत्साहात.....दीडशे दिव्यांग बांधवांना साहित्याचे वाटप; सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम

वेंगुर्ला
 

       जागतिक पांढरी काठी दिन व भाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला येथील साई मंगल कार्यालयात आयोजित दिव्यांग मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात सुमारे दीडशे दिव्यांग बांधव सहभागी झाले. यावेळी त्यांना सपोर्ट स्टिक, पांढऱ्या काठ्या तसेच आवश्यक कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी फोल्डरचे वाटप करण्यात आले.भाजपा दिव्यांग विकास आघाडी, सिंधुदुर्ग, कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग आणि राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.मेळाव्याचे उद्घाटन वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास गवडळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, भाजपा दिव्यांग जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे , साहस प्रतीष्ठानच्या रुपाली पाटील मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.राजन गिरप म्हणाले, दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना आवश्यक सुविधा आणि मदत उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यांच्याकडे सहानुभूतीने नव्हे, तर समानतेच्या आणि सन्मानाच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. दिव्यांग बांधवांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना मदतीचा हात देणारे असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहेत.प्रसन्ना देसाई म्हणाले, विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा मेळावा म्हणजे सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक प्रयत्न आहे. समाजातील दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांना स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. अशा उपक्रमांतून समाजात सकारात्मक संदेश पोहोचतो.अनिल शिंगाडे म्हणाले, दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना आवश्यक साधने आणि शासकीय योजनांची माहिती मिळाल्यास त्यांचे जीवन अधिक सुलभ होऊ शकते. दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांना योग्य सुविधा मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.या मेळाव्यात वाटप करण्यात आलेल्या सपोर्ट स्टिक आणि पांढऱ्या काठ्यांमुळे दिव्यांग बांधवांना दैनंदिन हालचालींसाठी मदत होणार आहे. तसेच कागदपत्रे ठेवण्यासाठी दिलेल्या फोल्डरचाही त्यांना उपयोग होणार आहे. वाढदिवसाचा आनंद सामाजिक उपक्रमांतून साजरा करण्याच्या भूमिकेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसन्ना देसाई यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. सचिन वासुदेव परुळकर यांनी केले.