मराठी चित्रपटसृष्टीवर कोकणाचे अधिराज्य.......दशावतार, कुर्ला टू वेंगुर्ला, छबी या चित्रपटांमुळे कोकण पुन्हा केंद्रस्थानी

मराठी चित्रपटसृष्टीवर कोकणाचे अधिराज्य.......दशावतार, कुर्ला टू वेंगुर्ला, छबी या चित्रपटांमुळे कोकण पुन्हा केंद्रस्थानी

 

परुळे

 

     मराठी चित्रपटसृष्टीत कोकणाचा दबदबा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘दशावतार’ हा चित्रपट कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात आणि देश-विदेशात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. कोकणातील सांस्कृतिक परंपरा, लोककला दशावतार, निसर्गसौंदर्य आणि त्याचे जतन यांचे सुंदर दर्शन या चित्रपटात घडते. प्रेक्षकांना हे कथानक भावत असून चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.

 

कोकणावर आधारित नव्या चित्रपटांची लाट

     कोकणाच्या पार्श्वभूमीवर आधारीत अनेक नवे चित्रपट सध्या चर्चेत आहेत. त्यात ‘कुर्ला ते वेगुर्ला’ हा चित्रपट विशेष लक्षवेधी ठरतो आहे. कोकणातील तरुणांच्या रखडलेल्या लग्नांच्या ज्वलंत विषयावर आधारीत हा चित्रपट  प्रदर्शित झाला आहे.तर, रहस्य आणि थराराने भरलेला ‘छबी’ हा सिनेमा प्रेक्षकांना रोमांचक अनुभव देतो आहे.याशिवाय आणखीही काही चित्रपट कोकणाच्या पार्श्वभूमीवर येऊ घातले असून मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी मिळत आहे.

 

निर्मात्यांचा आवडता प्रदेश : कोकण

    मराठी चित्रपटसृष्टीत मधल्या काळात दर्जेदार चित्रपटांचा अभाव जाणवत होता. मात्र कोकणावर आधारित चित्रपटांच्या यशामुळे पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण झाले आहे.कोकणातील समुद्रकिनारे, हिरवीगार डोंगररांग, पारंपरिक संस्कृती आणि लोकजीवन या गोष्टी निर्मात्यांसाठी आकर्षण ठरत आहेत.हॉलीवूडच्या लोकेशन्सना टक्कर देणारी स्थळे कोकणात आढळत असल्याने अनेक निर्माते इथं चित्रीकरणाकडे वळले आहेत. हिंदी तसेच इतर भाषिक चित्रपटांचे चित्रीकरणही कोकणात वाढले आहे.

 

रोजगार आणि पर्यटनाला चालना

    चित्रीकरणामुळे कोकणात स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.हॉटेल, वाहतूक, खानपान, पर्यटन सेवा आणि स्थानिक कलावंत या सर्व क्षेत्रांना या चित्रपट उद्योगातून नवा बाजार निर्माण होत आहे.यामुळे कोकणाच्या अर्थव्यवस्थेलाही सकारात्मक गती मिळत आहे.

 

कोकणाचा पडद्यावरचा प्रवास

     सन १९७७ मध्ये व्ही. शांताराम यांनी बनवलेला ‘चानी’ हा कोकणात चित्रीत झालेला पहिला महत्त्वाचा मराठी चित्रपट होता. अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या प्रमुख भूमिकेत हा सिनेमा वालावल व परिसरात चित्रित झाला होता.यानंतर ‘श्वास’ या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी सिनेमाचा झेंडा रोवला आणि ऑस्कर नामांकनापर्यंत मजल मारली.

 

निसर्ग, लोककला आणि बोलीभाषेचा संगम

       आज पुन्हा एकदा कोकण आपल्या लोककला, निसर्गसौंदर्य, बोलीभाषा आणि संस्कृती यामुळे चित्रपटसृष्टीच्या केंद्रस्थानी आला आहे.या नव्या प्रवाहामुळे मराठी चित्रपटसृष्टीला नवी दिशा आणि ओळख मिळत असून,“कोकण म्हणजे मराठी चित्रपटांचे हृदय” असेच म्हणावे लागेल